विधान परिषद उपसभापतींना दिले पत्र
मुंबई : सत्तेतून बाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. याबाबत शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतींना पत्र देण्यात आले आहे. शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही यासाठी स्पर्धेत आहे. विधानपरिषदेत शिवसेनेकडे १३ सदस्य आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी १०-१० सदस्य आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करू शकतात.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅड अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी तसे विधान परिषद सभापतींना विरोधी पक्ष नेतेपदाच्या दाव्याचे पत्रही पाठवले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे १३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. आता महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना विरोधी पक्षनेता करण्याच्या भूमिकेत आहे, तर काँग्रेसमध्ये मोहन कदम, राजेश राठोड, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेली विधानसभा निवडणूक लढली होती. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद पटकवण्यासाठी प्रसंगी दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.