हवामान खात्याचा अंदाज, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासह उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्याचा समावेश
पुणे : विकेंडला महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (१३ नोव्हेंबर) आणि रविवारी (१४ नोव्हेंबर) पुण्यासह एकूण ११ जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झाले आहे, तर उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुण्यातदेखील तापमानाचा पारा घसरला असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. राज्यात सर्वत्र सध्या थंडीचा कडाका वाढला असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तसेच उबदार कपडेही आता अडगळीतून बाहेर निघत आहेत.
दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी पुण्यासह ११ जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने अगोदरच येलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे पावसापूर्वी संबंधित जिल्ह्यांत वेगवान वारे वाहणार असून या वाºयाचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका असणार आहे. रविवारीदेखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून याच ११ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विकेंड फिरायला जाण्याचा प्लॅन करणाºया पुणेकरांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांंकडून देण्यात आला आहे.
तामिळनाडू, आंध्रात
जोरदार पाऊस
एकीकडे महाराष्ट्रात या आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तामिळनाडूत सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच आंध्रातदेखील पाऊस सुरू आहे. अनेक भागात पुराची स्थिती आहे. गुरुवारपर्यंत या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अलर्ट जारी केला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राची
तीव्रता आणखी वाढणार
सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तामिळनाडू, आंध्रात रेड अलर्ट
११ नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रावरदेखील होणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.