फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडातील लॉडरहिलमधील ‘सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड’वरती आज पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५९ धावांनी पराभव केला. त्यामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत भारताकडे ३-१ अशी विजयी आघाडी आली आहे.
वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा सर्व संघ १९.१ षटकांमध्येच गुंडाळला गेला.
भारताचे १९२ धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या इंडीजची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या १३ धावा असताना सलामीवीर ब्रँडन किंगच्या रुपात वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला. आवेश खानने त्याला बाद केले. त्यानंतर डेव्हॉन थॉमसलाही एक धावेवरच आवेशने बाद केले. कर्णधार पूरनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो २४ धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे विंडीजची अवस्था ५ षटकांत ३ बाद ४९ झाली. त्यानंतर सलामीवीर कायले मेयर्सही १४ धावा करून माघारी परतला. त्यानंतर ९ व्या षटकात रोव्हमन पॉवेलही २४ धावा करून बाद झाला. त्यामुळे ८२ धावांत अर्धा संघ माघारी परतला. अकील होसेनही सातव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्यामुळे १९.१ षटकांत १३२ धावा करून संपूर्ण संघच तंबूत परतला. त्यामुळे भारताचा शानदार विजय झाला.