नवी दिल्ली : यती नरसिंहानंद यांना चिथावणीखोर भाषणे देणे महागात पडणार असल्याचे दिसत आहे. अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी यती नरसिंहानंद यांचे एक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे मान्य केले आहे. तसेच नरसिंहानंदांविरोधात न्यायालयाची अवमाननाप्रकरणी खटला दाखल करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आधीच चिथावणीखोर भाषणांप्रकरणी आरोपी असलेल्या नरसिंहानंदांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
मुंबईत राहणा-या शाची नेल्ली यांनी नरसिंहानंद यांचे एक वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे सांगितले आहे. तसेच या वक्तव्यप्रकरणी नरसिंहानंदांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरू करण्याची परवानगी मागितली. यावर अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी देखील हे वक्तव्य न्यायालयाचा अपमान करणारे असल्याचे मान्य करत खटला चालविण्यास परवानगी दिली. नरसिंहानंद चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत.