नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी खेळी खेळली आहे. शिंदेंनी शिवसेनेवर दावा ठोकत १२ खासदारांची लोकसभेच्या सभापतींपुढे परेड केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या उच्चपदस्थ पदाधिका-यांना बोलावण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या सभापतींनाही या बैठकीत सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव यांनी गत २९ जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
– एकनाथ शिंदेंनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहांच्या भेटीनंतर ते थेट लोकसभेच्या सभापतींकडे गेले.
– महाराष्ट्रातील राजकीय संकटावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.
– एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या नेत्यांसोबत निवडणूक आयोगाकडेही जाणार आहेत. तिथे ते शिवसेनेवर दावा ठोकतील.