८ ऑगस्टपर्यंत मुदत
नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र शिवसेना आमदारांना सोबत घेऊन गेल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातच आता शिवसेना कोणाची, याचे पुरावे ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेतच असून शिवसैनिक आहोत, असे वारंवार सांगत आहेत, तर शिंदे गटातील आमदारदेखील हेच सांगत आहेत. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची, हा वाद कायम आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंना पुरावे सादर करावे लागणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. सावंत म्हणाले की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. दरम्यान, शिंदे गटाचे शंभुराज देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगाने मागितलेली कागदपत्रे आणि बहुमताचे पुरावे आम्ही मुदतीत नक्कीच सादर करू. तसेच निवडणूक आयोग आणि कायद्यावर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. आता दोन्ही गटांना ८ ऑगस्टपूर्वी आपले पुरावे सादर करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने शिंदे गट शिवसेनेची प्रतिनिधी सभा फोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी ब-यापैकी आहेत. यात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.