22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेकडून ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार

शिवसेनेकडून ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले असतानाच दुसरीकडे शिवसेनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी जारी केलेल्या एका पत्रकावर शिवसेनेकडून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीमधील सर्वांत मोठा घटक पक्ष असणारी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. देशामध्ये सुरू असणा-या जातीयवादी हिंसाचारावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रावर १३ विरोधी पक्षांनी स्वाक्ष-या केल्या. मात्र या १३ पक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश नाही.

या पत्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वाक्ष-या केल्या आहेत. देशामध्ये शांतता आणि एकता कायम राहावी, अशी मागणी करत या हिंसाचाराला कारणीभूत असणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या पत्रामधून करण्यात आलीआहे. हे पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन लिहिले असून पत्रामध्ये देशात सुरू असणा-या हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच मागील काही काळापासून द्वेषपूर्ण भाषणांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांदरम्यान होत असणारा हिंसाचार ही चिंतेची बाब असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर अनेक विषयांवरून टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करत सरकारवर निशाणा साधला आहे. दिवसेंदिवस हा विषय वाढत जाणार त्याप्रमाणे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला धक्का बसणार असल्याची भीती नेतृत्वाला वाटत असून शिवसेनासुद्धा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या गटात जाणार का यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत.

शनिवारी काँग्रेसच्या पुढाकाराने केंद्र सरकारला लिहिण्यात आलेल्या या पत्रावर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय (एम), पीसीआय, डीएमके, आरजेडी, जेकेएनसी आणि इतर पक्षांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. पंतप्रधान मोदी या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मौन बाळगून असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानांचे मौन पाहून आम्हाला धक्का बसला आहे. आपल्या वक्तव्यांनी आणि वागण्याने समाजातील काही घटकांना उकसवण्याचे काम करणा-यांविरोधात पंतप्रधान काही बोलत नाहीत किंवा कारवाई करत नाहीत हे धक्कादायक आहे. हे मौन म्हणजे अशाप्रकारच्या खासगी झुंडींना एकप्रकारे देण्यात आलेले समर्थन आहे, असे पत्रात म्हटले आहे.

‘देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये एक विशिष्ट पद्धत दिसून येत असल्याचे निदर्शनास आल्याने आम्हाला चिंता वाटते आहे. द्वेषपूर्ण भाषणांमुळे सशस्त्र धार्मिक मिरवणुका निघतात आणि त्यामधून हिंसा होत आहे,’ असे निरीक्षण विरोधी पक्षांनी या पत्रातून नोंदवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या