एकनाथ शिंदे यांचे ट्विट, आक्रमक शिवसैनिकांना आवाहन
मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेल्या दोन २४ तासांत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी नवे ट्विट केले आहे. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बंडखोर शिंदे गटाच्या व्यूहरचनेला निष्प्रभ करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवनात शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बंडखोर शिंदे गटाविषयी आक्रमक भूमिका घेतली गेली. त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे दोन मेळावे झाले. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांनो, मी तुमच्यासाठी लढतोय, अशा आशयाचे ट्विट केले आहे.
प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरिता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
नरेश म्हस्केंनी ठाणे जिल्हाप्रमुखपद सोडले
ठाणे : ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेली अडीच वर्षे शिवसेनेची राष्ट्रवादी गळचेपी चालली असून त्याचा निषेध म्हणून आपण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.