मुंबई : धार्मिक वादातून अमरावतीत तणाव निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतही अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. आरे कॉलनीतील शिवमंदिरात कळस यात्रेदरम्यान काल रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी आरे परिसरात जमावबंदी लागू केली असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे.
आरे कॉलनीत काल शिव कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात्रेदरम्यानच दोन गटांमध्ये वाद झाला. थोड्याच वेळात या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. नेमका वाद कशामुळे झाला, याबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही. मात्र, वादाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.
हाणामारीत ८ ते १० जण जखमी
काल आरे कॉलनीत झालेल्या या घटनेत ८ ते १० जण जखमी झाले आहेत. हाणामारीत जवळपास ५० जणांचे गट एकमेकांना भिडले होते. त्यात अनेक महिलादेखील होत्या. सुदैवाने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याआधीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.