एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले
मुंबई : जागतिक शेअर बाजारात दिसून आलेल्या अस्थिरतेचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसला. भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. आयटी आणि बँकिंग सेक्टरमध्ये आज विक्रीचा सपाटा दिसून आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६३१.८३ अंकांनी तर निफ्टी निर्देशांक १७६.३५ अंकांनी घसरला. बाजारात आज झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात दोन लाख कोटींचे नुकसान झाले.
शेअर बाजारातील व्यवहार किंचित तेजीसह सुरू झाले. त्यानंतर बाजारात नफा वसुलीचा दबाव वाढू लागला होता. सेन्सेक्समध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांक ६० हजार अंकांखाली घसरला होता, तर निफ्टी निर्देशांकाने आज दिवसभरात १७,८५६ अंकांची नीच्चांकी पातळी गाठली होती.
आज मुंबई शेअर बाजार सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल घटले आहे. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल मंगळवारी २८०.८९ लाख कोटी रुपये इतके झाले. सोमवारी 9 जानेवारी रोजी, बीएसईचे बाजार भांडवल २८२.९९ लाख कोटी रुपये इतके झाले होते. आज बाजारात झालेल्या घसरणीमुळे बाजाराच्या भाग भांडवलात २.१० लाख कोटींची घट झाली. सेन्सेक्स निर्देशांकातील ३० पैकी ९ कंपन्यांच्या शेअर दरात आज तेजी दिसून आली.