25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रश्रींचे स्वागत धुमधडाक्यात

श्रींचे स्वागत धुमधडाक्यात

एकमत ऑनलाईन

सर्वत्र जल्लोष, भक्तिरसात न्हाऊन निघाले भक्तगण
मुंबई : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष आणि ढोल ताशाच्या गजरात आज मुंबई, पुण्यासह राज्यात धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत करण्यात आले. राजकीय पक्ष, सेलिब्रिटी यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. तसेच घराघरांतही मूर्तीची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा केली. या निमित्ताने राज्यातील सर्वच शहरे रोषणाईने उजळून निघाली आहेत. तसेच गणेशभक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या २ वर्षांपासून गणेशोत्सव घरातच साध्या वातावरणात साजरा करावा लागला. सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापनाच करता आली नाही. त्यामुळे गणेशभक्तांत नाराजी होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट टळल्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जल्लोषपूर्ण वातावरणात आज ठिकठिकाणी गणरायाचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही प्रचंड गर्दी होती. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडपही सजविण्यात आले होते. आज दिवसभर घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच गणेश मंडळांनीही वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना केली.

मुंबईत लालबागचा राजा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, राजा राम मंदिरात बाप्पा विराजमान झाले आहेत. यानंतर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या. इतर गणेश मंडळांनीही मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यानिमित्ताने मंडपही सजविण्यात आले असून, राजकीय नेतेही दर्शनासाठी ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत. याशिवाय पुण्यातही गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतींच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. ढोल-ताशांच्या गजराने वातावरण सूरमय झाले. तसेच धनकवडी भागात ९ मंडळांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली. राज्यातही सर्वत्र गणरायाचे स्वागत करण्यात आल्याने गणेशभक्त भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. ढोल-ताशांच्या गजरात सर्वत्र गणरायाचे स्वागत करण्यात आले.

कोकणात गणपती उत्सव जोमात
गणपती उत्सवाचा आज पहिला दिवस असल्याने कोकणात चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. कोकणातील मुंबईत असलेले सर्वजण आपापल्या गावी गोळा झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावोगावचा आनंद द्विगुणीत झाला आहे. कोकणातही सर्वत्र गणेशभक्तांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. यासोबतच कोल्हापुरातही ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया, असे म्हणत गणेशाचे आगमन आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो, असे म्हटले. तसेच गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी सामाजिक भान राखणे गरजेचे आहे, असेही म्हटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

वरुणराजाने केले
गणरायाचे स्वागत
राज्यात आज घरोघरी गणरायाचे वाजतगाजत आगमन होताच वरुण राजाने गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. मुंबई, कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातही काही भागांत पाऊस झाला आहे. मुंबईसह ठाणे शहर आणि कल्याण, बदलापूर, अंबरनाथमध्ये संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. कोकणातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह दुणावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या