नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही मुकेश अंबानी यांचे नाव आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये पाहिले असेल. मात्र, आता अंबानींनाही एका भारतीय उद्योजकाने मागे टाकले आहे. गौतम अदानी यांनी त्यांना पिछाडीवर टाकून आशियातील सर्वाधिक धनाड्य व्यक्ती बनले आहेत. इतकेच नव्हे तर जगातील टॉप १० श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गौतम अदानींचे नाव आले आहे. त्यांनी मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले आहे.
ब्लूमबर्ग बिलियनायर्स इंडेक्सच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार, अदानी समुहाचे मुख्य गौतम अदानींची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या पार गेली आहे. यासोबतच ते आता सेंटीबिलियनायरच्या लिस्टमध्ये सामील झाले आहेत. सेंटीबिलियनायर त्या लोकांना म्हटले जाते ज्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या वर गेली आहे. या आकडेवारीसह आता अदानी एलॉन मस्क आणि जेफ बेजोसच्या गटामध्ये सामील झाले आहेत.
जगात कोण कितव्या क्रमांकावर?
क्रमांक १ – टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क – २७३ बिलीयन डॉलर
क्रमांक २ – अॅमेझॉनचे जेफ बेजोस – १८८ बिलीयन डॉलर
क्रमांक ३ – फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट – १४८ बिलीयन डॉलर
क्रमांक ४ – बिल गेट्स – १३३ बिलीयन डॉलर
क्रमांक ५ – वॉरेन बफेट – १२७ बिलीयन डॉलर
क्रमांक ६ – लैरी पेज – १२५ डॉलर
क्रमांक ७ – सेरगी ब्रिन – ११९ बिलीयन डॉलर
क्रमांक ८ – स्टीव्ह बालमेर – १०८ बिलीयन डॉलर
क्रमांक ९ – लॅरी एलिसन – १०३ बिलीयन डॉलर
क्रमांक १० – गौतम अदानी – १०० बिलीयन डॉलर
यावर्षी २४ अब्ज डॉलरने वाढली संपत्ती
ब्लूमबर्ग बिलियनायर्स इंडेक्सनुसार गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये यावर्षी २४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानी यावर्षी जगातील सर्वाधिक लाभ कमावणा-या उद्योजकांमधील एक ठरले आहेत. वास्तविकत: अदानी कॉलेजमधून ड्रॉपआऊट झालेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. ग्रीन एनर्जीशी निगडीत त्यांच्या कंपनीचा कारभार अत्यंत गतीने पसरत आहे.