नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली असून, कोरोनाचे संक्रमण चालूच राहील. पण महामारीचा अंत जवळ आला आहे, असे द लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.
सध्या ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉनची लाट गेल्यानंतरदेखील कोरोना होईल. पण, महामारी येणार नाही. कोरोना सर्दी-खोकल्यासारखा वारंवार होणार आजार असेल. पण, त्याला आवर घालण्यासाठी आरोग्य यंत्रणांना योग्य ते व्यवस्थापन करावे लागेल. सरकारने कोरोनाला आवर घालण्यासाठी लॉकडाऊनसारखे उपाय केले होते. ते आता करावे लागणार नाहीत, असेही लॅन्सेट अहवालामध्ये म्हटले आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण सुरूच राहील. तसेच लसीकरणामुळे मिळालेली रोगप्रतिकारशक्ती कमी होताच कोरोनाचा होण्याचा धोका असेल. देशात हिवाळ्यात सर्वाधिक संक्रमणाची शक्यता आहे. पण, विषाणूचा प्रभाव कमी असेल. कोरोना लसी, आधीच अनेक लोकांना होऊन गेलेला संसर्ग यामुळे कोरोनाचे आरोग्यवर कमी परिणाम होतील. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण कोरोनाच्या येणा-या लाटांमध्ये संरक्षण करू शकतो, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यर्थ
काही देशांमध्ये अद्याप ओमिक्रॉनची लाट आलेली नाही. अशा देशांमध्ये देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढून लवकरच पीक येण्याची शक्यता आहे. त्याला आवर घालण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. तसेच ओमिक्रॉन संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यर्थ असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.