36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रसंगीत रंगभूमीच्या शिलेदार हरपल्या

संगीत रंगभूमीच्या शिलेदार हरपल्या

एकमत ऑनलाईन

पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे शनिवारी (२२ जानेवारी) पहाटे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती, त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कीर्ती शिलेदार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी पुणे येथे झाला. वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्याने त्यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना कलेचा वारसा मिळाला. वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील बी.ए.ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली. देशविदेशात संगीत नाटकांचे प्रयोग, नाट्यपदांच्या मैफली, सप्रयोग व्याख्याने त्यांनी दिली. पारंपरिक संगीत नाटकांप्रमाणेच स्वरसम्राज्ञी, अभोगी, मंदोदरी आदी वेगळ््या धाटणीची नाटकेही त्यांनी आपल्या स्वराभिनयाने गाजवली.

विद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या निमित्ताने कीर्ती यांना नीळकंठबुवा अभ्यंकर गुरु म्हणून लाभले. अभ्यंकरबुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या.

शिलेदार यांनी अनेक जुन्या संगीत नाटकांतून भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. तबला व पखवाज वाजवण्यातही त्या निपुण होत्या. त्यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कीर्ती शिलेदारांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

२७ नाटकांतून ३४ भूमिका साकारल्या
कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनींच्या संगीत नादलुब्ध मी आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्ती शिलेदार यांनी केले.

संगीत नाटकांचे ४ हजारांवर प्रयोग
विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होते. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून विविध संगीत नाटकांचे त्यांनी चार हजारांहून अधिक प्रयोग सादर केले होते.

संगीत रंगभूमीची अपरिमित हानी : मंत्री अमित देशमुख यांची श्रद्धांजली
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली. कीर्तीताईंनी आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीत आणि अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे वाढवत नेला, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या