मुंबई : खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना ‘विधिमंडळ हे तर चोरमंडळ’ असे वक्तव्य करणे महागात पडले आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांचे वादग्रस्त विधान भोवले आहे. संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधिमंडळात आक्रमक झाले आहेत. तसेच, मविआमधील नेत्यांनीही सत्ताधा-यांना यासंदर्भात सहमती दर्शवली होती.
संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकावू बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत.
त्यामुळे त्यांच्या जिभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जिभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत, असे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.
अजित पवारांनी सहमती दर्शवली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे.
राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळायला हवी. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण कुणी काहीही बोलायला नको. त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघायला हवे. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळाने घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.