लातूर : जैन समाजातील ज्येष्ठ सुश्राविका सौ. शकुंतला देवी रुपचंदजी पोकर्णा यांनी ज्येष्ठ महसाध्वी, नवकार आरधिका डॉ. प्रतिभाजी महाराज यांच्यामार्फत दि. २० एप्रिल रोजी जैन धर्मियांचे संथारा व्रत (सलेखना) स्वेच्छेने धारण केले. त्या ६५ वर्षाच्या असून मागील काही दिवसांपासून आजारी आहेत.
संथारा व्रतमध्ये अन्न, जलचा पूर्णत: त्याग केला जातो. परंतु सौ. शकुंतलादेवी यांनी फक्त गरम पाण्याची सुट ठेवली आहे. आपल्या कुटुंबाची व समाज प्रमुखांची परवानगी घेऊन त्यांनी रीतसर सलेखनाचे महान व्रत धारण केले. त्यांची प्रकृती खालावत असून आज या व्रतचा नववा दिवस (२८ एप्रिल) आहे. सौ. शकुंतलादेवी अत्यंत धार्मिक वृत्तीच्या दृढधर्मी महिला असून साधू साध्वीच्या सेवेत व धर्माचरण करण्यास त्यांनी आपल्या जीवनात प्राथमिकता दिली.
जैन धर्मीयांत १) अपरिग्रह, २) दीक्षा, ३) संथारा असे तीन मनोरथ सांगितले असून संथारा मरणला समाधी, पंडित मरण ही संबोधिले गेले आहे. यात संथाराव्रतधारी व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो, अशी जैन धर्मात मान्यता आहे. हे एक महान तपस्या व्रत असून साधारणत: जीवनाच्या अंतिम समयी हे व्रत अंगीकारले जाते. निश्चय क्लासेस जवळ, मोतीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या दर्शनासाठी स्थानिक व बाहेर गावच्या श्रावक श्राविकांची रीघ लागली आहे.
त्या माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या भावजय तर लातूर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल छाजेड यांच्या मामी आहेत. संथारा व्रतधारी शकुंतलादेवी यांच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोकर्णा, छाजेड कुटुंबीयांनी केले आहे. ही माहिती राजेश डुंगरवाल यांनी दिली.