29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसंधीवाताचे औषध ठरणार कोरोनावर प्रभावी!

संधीवाताचे औषध ठरणार कोरोनावर प्रभावी!

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ महामारीपासून रुग्णांचे संरक्षण करण्यासाठी दोन औषधांच्या वापरास मान्यता दिली आहे. कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यास ही दोन्ही औषधे दिली जाऊ शकतात. विशेष म्हणजे या दोन औषधांपैकी एक औषध संधीवाताचे आहे. मात्र, या औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णाला तात्काळ आराम मिळेल. त्यामुळे कोरोनामुळे होणा-या मृत्यूंचा आकडाही खाली येईल, असे मानले जात आहे.

मान्यता दिलेल्या दोन औषधांपैकी पहिल्या औषधाचे नाव बेरिसिटिनिब असे आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेले हे औषध आहे. हे औषध संधिवाताच्या उपचारासाठी वापरले जाते. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून, जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे.हे औषध गंभीर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरता येते. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यास प्रतिबंध करते. हे औषध स्टिरॉइड्ससोबत देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. योग्य पद्धतीने औषधोपचार केल्यास कोरोनाचा गंभीर रुग्ण बरा होतो, असा दावा करण्यात आला आहे.

यासोबतच कोरोना रुग्णांना मोनोक्लोनल एंटीबॉडी औषध सोट्रोविमॅब देण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर नाही, त्यांना हे औषध दिले जाऊ शकते. यासोबतच उच्च जोखमीचे रुग्ण आहेत, त्यांनाही हे प्रभावी ठरू शकते. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने कॅसिरिवीमॅब-इम्डेवीमॅबच्या कॉम्बिनेशन अँटीबॉडी कॉकटेलच्या वितरणासदेखील मान्यता दिली आहे.

भारतातील अनेक रुग्णांना हे औषध आधीच दिले जात आहे. अनेक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर संसर्ग झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोनोक्लोनल अँटीबॉडी इंजेक्शन्स घेऊन कोरोनावर उपचार घेत आहेत. तथापि, अँटीबॉडीजसह उपचार करणे थोडे महाग आहे. हे औषध घेतल्यानंतर ४-५ दिवसांत रुग्ण कोरोना निगेटिव्ह होतो. त्यामुळे या औषधाच्या वापरासही मान्यता देण्यात आली आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांच्या वापराला मान्यता दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार ओमिक्रॉनचा आता जगभरातील १४९ देशांमध्ये प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने लिलिच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.

जुलै-सप्टेंबरमध्ये तीन औषधांना दिली मान्यता
या अगोदर जागतिक आरोग्य संघटनेने जुलै २०२१ मध्ये टोसिलिझुमॅब आणि सरिलुमॅब या संधिवात औषधांच्या वापरास मान्यता दिली. त्याच वेळी सप्टेंबरमध्ये डब्ल्यूएचओने सिंथेटिक अँटीबॉडी उपचार रेजेनेरॉनला मान्यता दिली होती.

कुणाला औषध देता येईल?
ओल्युमियांट या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध कोरोनाची तीव्र लक्षणे असणा-या रुग्णांनाच देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईड सोबतच हे औषध देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावलीदेखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
मोनोक्लोनल अँटिबॉडी

थेरपीचाही दिला सल्ला
ओल्युमियांटसोबतच जीएसके-वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मात्र, ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक ठरत असल्याचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित देशांनी या दोन्ही उपचार पद्धतींविषयी निर्णय घ्यायचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या