लखनौ : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाने सोमवार दि. १८ एप्रिल रोजी फेटाळला असून, आशिष मिश्राला आठवडाभरात कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. यावर प्रतिक्रिया देताना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. लखीमपूर खेरी घटनेवर सुप्रीम कोर्ट सुरुवातीपासूनच लक्ष ठेवून आहे. याबाबत कोर्टाने यूपी सरकारलाही फटकारले आहे असे त्यांनी नमूद केले.
राकेश टिकैत पुढे म्हणाले की, एसआयटीची जी टीम तयार केलीय, त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे काम करावे असे आम्ही वारंवार सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने योग्य काम केले नाही म्हणूनच आशिष मिश्राला जामीन मिळाला. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर सुनावणी केली असता तो जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर आठवडाभरात पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालय सुरुवातीपासूनच याची दखल घेत आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण न्यायाची आशा आहे असे त्यांनी सांगितले.