मुंबई : शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आज सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी त्या भायखळा तुरुंगाच्या बाहेर आल्या. साडेसहा वर्षानंतर शिना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांना जामीन मिळाला. साडेसहा वर्षानंतर पहिल्यांदाच इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगाबाहेर पाऊल ठेवले.
खटला लवकर संपण्याची शक्यता नसताना सुमारे साडेसहा वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. या कारणाखाली सर्वोच्च न्यायालयाने शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या जामिनावरील सुटकेचा आदेश काढला. त्यानुसार दोन लाख रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर त्यांची भायखळा तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणी मुखर्जी त्यांच्या वकिलांसोबत आपल्या मर्सिडीज कारमधून घराकडे रवाना झाल्या.