मुंबई : विधानपरिषदेचे सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा विधान परिषदेच्या मैदानात उतरले आहेत. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही चुरस वाढली असून, प्रत्येकजण आपापली पक्षीय मते एकट्टा करतानाच इतर पक्षांची मते कसे मिळविता येतील, यासाठी प्रयत्नशील आहेत. या परिस्थितीत भाजपमधील आमदार जावयाची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण सासरे रामराजे निंबाळकर मैदानात आहेत. अशावेळी पक्षीय निष्ठा कायम ठेवायची की, सास-याच्या विजयात हातभार लावायचा, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.
जावई राहुल नार्वेकर हे सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सासरे रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. ते १९९१ मध्ये फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. १९९५ मध्ये सर्वप्रथम ते फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राज्यातील अपक्ष २२ आमदारांची मोट बांधून त्यांनी शिवसेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता.
शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यावेळी रामराजे राष्ट्रवादीसोबत गेले. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना रामराजेंना महसूल राज्यमंत्रिपद देण्यात आले. २००४ मध्ये रामराजेंची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. साता-याच्या पालकमंत्रिपदाची धुराही देण्यात आली होती. २०१३ मध्ये रामराजेंना राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले.
रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत. आधी नार्वेकर शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झाले आणि आमदार झाले. शरद पवार यांनी २०१० मध्ये रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांना तिस-यांदा विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. अशातच गुप्त मतदान असल्यामुळे जावईबापूंचे मत रामराजे मिळवणार का, याची उत्सुकता आहे.