बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राच्या तुकड्या
मुंबई : बहुमत चाचणीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात करण्यात येणार आहेत. आमदारांच्या सुरक्षेसाठी २ हजार सीआरपीएफचे जवान तैनात असतील, असे सांगण्यात आले. ३ विमानांद्वारे हे जवान दाखल झाले आहेत.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. बंडखोर गटाचे आमदार एकनाथ शिंदेसह सर्व आमदार आज गुवाहाटीतून गोव्यात दाखल झाले असून, उद्या गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे.