मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली व देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.
खंडणी वसुली व मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून ईडी आणि सीबीआय अशा दोन तपास यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. सध्या देशमुख हे सीबीआयच्या ताब्यात असून देशमुख यांना आणखी तीन दिवसांची सीबीआय कोठडी मिळावी, अशी विनंती विशेष सीबीआय कोर्टाकडे अर्ज करण्यात आला होता. पोलिस दलातील बदल्या आणि नेमणुका याबाबत देशमुख यांच्यावर जे आरोप आहेत, त्याची आणखी चौकशी करायची असल्याने ही कोठडी हवी आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी नमूद केले. मात्र, ही विनंती कोर्टाने अमान्य केली व देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
वाझे, शिंदे, पलांडेच्या
न्यायालयीन कोठडीत वाढ
अनिल देशमुख हे गेल्या ११ दिवसांपासून सीबीआय कोठडीत आहेत. ६ एप्रिल रोजी त्यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी आणखी पाच दिवसांनी कोठडी वाढवण्यात आली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे तसेच मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे या तिघांच्या न्यायालयीन कोठडीतही आज वाढ करण्यात आली.