26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडासूर्यकुमार तळपला, मात्र झुंज अपयशी

सूर्यकुमार तळपला, मात्र झुंज अपयशी

एकमत ऑनलाईन

तिस-या सामन्यात टीम इंडियाचा पराभव
नॉटिंगहम : सूर्यकुमार यादव इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे एकटा लढला. त्याने धडाकेबाज शतकही झळकावले. पण त्याला अन्य फलंदाजांची चांगली साथ लाभली नाही आणि त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी २१६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रिषभ पंत, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर सूर्यकुमारने शतक झळकावले. पण तो भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने या सामन्यात भारतावर १७ धावांनी विजय साकारला.

या पराभवामुळे भारताच्या विजयी रथाला ब्रेक लागला आहे. सूर्यकुमार यादवने यावेळी ५५ चेंडूंत तब्बल १४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ११७ धावांची अफलातून खेळी साकारली. पण सूर्यकुमारची ही एकाकी झुंज अपयशी ठरली. सूर्यकुमारचे हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. सूर्यकुमारने ४८ चेंडूंत आपले शतक चौकारासह साजरे केले होते.

इंग्लंडच्या २१६ धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताचा सलामीवीर रिषभ पंत यावेळी फक्त एकच धाव करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि पुन्हा एकदा त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. कोहलीने सुरुवात चांगली केली होती. कोहलीने एक चौकार आणि एक षटकारही लगावला. पण त्यानंतर कोहलीकडून मोठी चूक घडली आणि तो ११ धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्याच्या धक्क्यातून भारतीय संघ सावरत होता. पण त्याचवेळी भारताला रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी ११ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर भारताचा डाव सूर्यकुमार यादवने सावरल्याचे पाहायला मिळाले.

सूर्यकुमारने यावेळी दमदार शतक झळकावत संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता, पण तो २८ धावांवर बाद झाला. अखेरपर्यंत सूर्यकुमार झुंजत राहिला. परंतु त्याला विजय साकारता आला नाही. भारतीय संघाने या सामन्यात चार मोठे बदल केले होते.

या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या अवेश खानने यावेळी इंग्लंडला पहिला धक्का दिला. अवेशने यावेळी इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जोस बचलरला बाद केले, बटलरला यावेळी १८ धावा करता आल्या. त्यानंतर भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर जेसन रॉयला बाद केले आणि इंग्लंडला दुसरा धक्का दिला. जेसन रॉयला यावेळी २७ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडच्या संघात स्थान मिळालेल्या फिल सॉल्टला ८ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर मात्र इंग्लंडच्या डेव्हिड मलानने भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळाकवल्यावरही डेव्हिड दमदार फटकेबाजी करत होता. डेव्हिडला यावेळी लायम लिंिव्हगस्टोनने चांगली साथ दिली. मलानने यावेळी ७७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. लायम लिंिव्हगस्टोनने नाबाद ४२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळेच इंग्लंडला भारतापुढे २१६ धावांचे आव्हान ठेवता आले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या