सेनेगल : आफ्रिकन देश सेनेगलच्या संसदेत सोमवारी महिला मंत्र्याला कानशिलात लगावल्याने तुफान राडा झाला. एका खासदाराने महिला मंत्र्याला झापड मारली. संतापलेल्या महिला मंत्र्यांनी त्यांच्यावर खुर्ची फेकली. हा वाद इतका वाढला की दोन्ही नेत्यांमध्ये तुफान हाणामारी करीत एकमेकांना लाथाबुक्क्यांनी झोडपले.
संसदेत उपस्थित इतर सदस्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना घडली तेव्हा संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. सत्ताधारी पक्षाच्या बेनो बोक याकरच्या महिला मंत्री एमी एनडीये गनिबी यांनी अध्यक्ष मॅकी सॅल यांच्या तिस-या कार्यकाळाला विरोध करणा-या आध्यात्मिक नेत्यावर टीका केली. विरोधी पक्षाचे खासदार मस्साता सांब यांना ही गोष्ट खटकली. त्यांनी आपल्या जागेवरून उठत गनिबी यांना चापट मारली.