नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका तरुणाने स्वत:चाच गळा कापला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याने स्वत:चा गळा कापून रस्त्यावर गोळीबार केला असून या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी कंट्रोल रूमला फोनवरून ही माहिती मिळाली. नाथू कॉलनी येथे एक तरुण आपलाच गळा कापून रस्त्यावर धावताना दिसत असून त्याच्या हातात एक बंदूकही असल्याचे फोनमध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिकांनी सदर व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने एका पोलिस अधिका-याला जखमी केले आणि त्यांचे पिस्तूल हिसकावत एक राऊंड फायर केला. नंतर पोलिसांनी त्याला पकडत त्याच्या ताब्यातून पिस्तूल जप्त केले आहे.
कृष्णा शेरवाल असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो त्याच्या बायकोपासून वेगळा झाल्यानंतर तणावात होता आणि या तणावाखाली त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.