नवी दिल्ली : हनुमान जयंतीनिमित्त दक्षिणेकडील कर्नाटक राज्यापासून आंध्र प्रदेश आणि दिल्लीपर्यंत समाजकंटकांनी धुमाकूळ घातला आहे. कुठे शोभा यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली, तर कुठे हनुमान मंदिराची तोडफोड करण्यात आली. कर्नाटकातील हुबळी येथे जमावाने गोंधळ घातला.
हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त लाभू राम यांनी पत्रकारांना सांगितले की, सुमारे ४० जणांना अटक करण्यात आली असून काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्तव्यावर असलेले आमचे १२ अधिकारी जखमी झाले असून पोलिसांच्या काही वाहनांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले.
शनिवारी आंध्र प्रदेशातील कुरनूलच्या अल्लूर येथील होलागुंडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्ष आणि कथित दगडफेकीत किमान १५ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान जयंती मिरवणुकीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक मिरवणूक डीजे वाजवत गाणे वाजवत मशीद ओलांडत असताना दगडफेक झाल्याचे निदर्शनास आले.
आंध्र प्रदेशात दोन गटांत राडा
विश्व हिंदू परिषदेने अल्लूर, कुरनूल येथील होलागुंडा येथे हनुमान जयंती साजरी केली. पोलिसांच्या मनाईनंतरही त्यांनी डीजे वापरला. जेव्हा ते मशिदीजवळ गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना डीजे बंद करण्यास सांगितले. पण, त्यांनी बंद केले. मशिदीसमोर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. यावर काही वेळातच तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक झाली. पोलिस दलाने घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवले. दगडफेक सुमारे १० मिनिटे चालली.
दिल्लीत हिंसाचार
राजधानी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागातील जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर ंिहसाचार उसळला. याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये दगडफेक झाली आणि काही वाहने जाळण्यात आली, असे ते म्हणाले. या हिंसाचारात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि एक उपनिरीक्षक गोळया लागल्याने जखमी झाले आहेत.