हिंगोली : आखाडा बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे नेवरवाडी येथील वैभव भाऊराव गयाळ (२०) हा रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. १ एप्रिलच्या सकाळी अकराच्या सुमारास वैभव गयाळ हा आपल्या शेवाळा शिवारातील शेतात उन्हाळी सोयाबीनमधील स्प्रिंकलर बदलत होता. रानडुकराने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला, त्यात त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी युवकास नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबतची माहिती आणि तक्रार वन विभागाकडे करण्यात आली आहे. या परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. अनेक पिकांची नासाडी होत असून, जीवितास ही धोका निर्माण झाला आहे, या सर्व बाबीकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असून, रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.