पोलिसांवर कारवाई करण्याची चौकशी आयोगाची शिफारस
हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगाने हैदराबाद पोलिसांनी दिशा बलात्कारकांडातील आरोपींचे केलेले एन्काउंटर फेक असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणात सहभागी पोलिसांवर कारवाई करण्याचीही शिफारस केली आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या शिरपूरकर आयोगाने आपला अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. या अहवालानुसार पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींचे फेक एन्काउंटर केले होते.
बलात्कारानंतर आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर कोर्टाने सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांच्या नेतृत्वात एक चौकशी आयोग स्थापन केला होता. या आयोगात मुबंई हाय कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश रेखा बालदोता व सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश होता.
हैदराबादच्या शमशाबादेत २७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुचाकी पंक्चर झाल्यामुळे एका टोल प्लाझाजवळ प्रतीक्षा करणा-या २६ वर्षीय वेटरनरी डॉक्टर दिशाची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती. जळालेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह दुस-या दिवशी आढळला होता. सर्वच आरोपी ट्रक ड्रायव्हर व क्लीनर होते. त्यांनी मद्याच्या नशेत ७ तासांपर्यंत दिशावर बलात्कार केला होता. त्यानंतर शादनगर भागात तिला जाळून टाकले होते. या प्रकरणाचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली होती. पण ६ डिसेंबर रोजी अचानक त्यांचे घटनास्थळी एन्काउंटर झाल्याचे उजेडात आले. यालाच दिशा एन्काउंटर म्हटले जाते.
पोलिसांनी पीडितेची ओळख लपवून ठेवण्यासाठी या प्रकरणाला दिशा नाव दिले होते. आरोपींत मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ उर्फ अहमद, जोलू शिवा, चिंताकुंतला चेन्नाकेशवुलु, जोलू नवीन यांचा समावेश होता. यातील आरिफ २६ वर्षांचा होता, तर उर्वरित सर्वजण २० वर्षांखालील होते.