१८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस
नवी दिल्ली : देशात रविवारपासून खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाविरोधी बूस्टर डोस देण्याचे काम सुरू करण्यात आले. ज्या नागरिकांना दुसरा डोस देऊन ९ महिने पूर्ण झाले, अशा नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. त्यासाठी देशभरातील केंद्रांवर १७.४७ कोटी लस उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारने अगोदरच स्पष्ट केले होते की, ज्या लसीचे पहिले आणि दुसरे डोस झालेले आहेत, त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून देशात सर्वत्र बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली असून, या अगोदर ज्यांनी जी लस घेतली, त्याच कंपनीच्या लसीचा बूस्टर डोस घ्यावा. त्यासाठी सर्वत्र खाजगी लसीकरण केंद्रांवर या लस उपलब्ध करून दिल्या आहेत. खाजगी केंद्रांवरून बूस्टर डोस घेताना लसीची किंमत आणि सेवा कराच्या रुपात १५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्य सचिवांची बैठक आयोजित करून यासंदर्भातील नियोजनाची माहिती दिली होती. विशेष म्हणजे बूस्टर डोससाठी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. कारण सर्वच लाभार्थी अगोदरपासूनच कोविन पोर्टलवर नोंदणीकृत आहेत, असेही सांगण्यात आले. सर्व लसींच्या नोंदी कोविन पोर्टलवर अनिवार्य केल्या आहेत. विशएष म्हणजे ऑनलाईन अॅपॉईंटमेंट आणि वाक ईन नोंदणी आणि लसीकरण दोन्हीही पर्याय खाजगी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असतील, असेही सांगण्यात आले.
आरोग्य कर्मचा-यांना
मोफत लसीकरण
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासह ६० वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोणत्याही लसीकरण केंद्रावरून बूस्टर डोस घेता येणार आहे, तर सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण होणार आहे, असे भूषण यांनी सांगितले.