मुंबई : कोरोनाच्या तिस-या लाटेदरम्यान महाराष्ट्र सरकारसाठी टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. सुमारे एक कोटीहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी पूर्ण लसीकरण करून घ्यावे, यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक प्रशासनांना सूचना दिल्या आहेत.
जवळपास १ कोटी १४ लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. पात्र असूनही ९७.६१ लाख लाभार्थ्यांनी कोविशील्डचा दुसरा डोस घेतलेला नाही, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेणा-यांची संख्या १७.३२ लाख इतकी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच दुसरा डोस न घेणा-या लाभार्थ्यांची यादी लांबलचक आहे आणि ही बाब राज्य सरकारसाठी चिंता वाढवणारी आहे. लसीकरण मोहिमेतील अधिका-यांनी सांगितले की, नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. लसीचा दुसरा डोस घ्यावा, यासाठी नागरिकांना केंद्रावर जाण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही समाधानकारक प्रगती दिसून आलेली नाही.
महानगरांतच ढिलाई
पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नागपूर या महानगरांमध्ये कोविशील्ड लशीचा दुसरा डोस न घेणा-याची संख्या सर्वाधिक आहे, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेणा-यांची संख्या बुलडाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि नांदेडमध्ये सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
लसीकरणाची मोहीम १० दिवसांपासून थंडावली
गेल्या १० दिवसांत लसीकरण मोहीम थंडावली आहे. दिवसाला सरासरी तीन ते पाच लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आता लसीकरण कमी झाले. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे दीड कोटी डोस देण्यात आले आहेत. तर जवळपास एक कोटी कोव्हिशील्ड आणि २० लाख कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत, असे म्हटले.