मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये काही दिवसांपासून वाढ होत आहे. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका असून, त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. तिस-या लाटेदरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या दुस-या लाटेच्या तुलनेने कमी झालेली असली, तरी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २३. ८२ टक्के असून, त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. त्यावर मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केल्याचे समजते.
राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही आणि या जिल्ह्यांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण आणि चाचण्यांचा वेग वाढवण्यासह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्याच्या आवश्यकतेवर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिक भर देण्यात आला.