28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीय२९ मोबाईलमध्ये पेगासस आढळले नाही

२९ मोबाईलमध्ये पेगासस आढळले नाही

एकमत ऑनलाईन

५ फोनशी मालवेअरची छेडछाड, सुप्रीम कोर्टाच्य समितीचा अहवाल
नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणा-या इस्त्राईलच्या स्पायवेअर पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर पेगासस आढळून आले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईलचे परीक्षण केले असल्याची माहिती समितीच्या अहवालात मांडण्यात आली. मात्र, २९ पैकी ५ फोनशी मालवेअरद्वारे छेडछाड झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.

मात्र, ती छेडछाड पेगासस किंवा कोणत्या स्पायवेअरद्वारे करण्यात आली हे अहवालात नमूद करण्यात आले नाही. सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. रविंद्रन यांच्या समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. देशातील ३०० नागरिकांच्या फोनची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये राजकीय नेते, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

समितीचा अहवाल ३ भागात सादर करण्यात आला आहे. स्पायवेअरची छेडछाड झाली की नाही तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या फोनच्या डिजीटल इमेजेस, तांत्रिक समितीचा अहवाल आणि न्यायमूर्ती रविंद्रन यांचा अहवाल असे त्याचे स्वरुप आहे.काही मालवेअरचा गैरवापर करुन नागरिकांच्या सुरक्षेशी आणि त्यांच्या गोपनियतेशी खेळ केला जात असल्याचे निरीक्षणदेखील समितीने नोंदवले आहे. मालवेअरच्या वापरावरील नियंत्रणासाठी समितीने सूचना केल्या आहेत. त्यासाठी काही कार्यपद्धती देखील मांडण्यात आल्या आहेत.

गोपनियतेच्या अधिकाराचे
संरक्षणही झाले पाहिजे
देशाच्या सायबर सुरक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासोबत नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेदेखील संरक्षण झाले पाहिजे, असेदेखील समितीने म्हटले आहे. अनधिकृतपणे निरीक्षण ठेवले जाण्यापासून नागरिकांचे संरक्षण केले जावे, अशा सूचना समितीने दिल्या आहेत. सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास यंत्रणा निर्माण करण्याची गरज समितीने मांडली आहे. देशाच्या सायबर सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्याची शिफारस समितीने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या