मुंबईतील कंपनीकडून नेझल स्प्रेची निर्मिती
मुंबई : मुंबईतील औषध निर्मिती करणारी कंपनी ग्लेनमार्कने कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत मिळून नेझल स्प्रेची निर्मिती केली आहे. हा स्प्रे नाकात मारल्यानंतर २४ तासांत कोरोना रुग्णामधील व्हायरल लोड ९४ टक्के कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे, तर ४८ तासांत कोरोना विषाणूचा प्रभाव ९९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये या औषधाच्या चाचणीच्या तिस-या टप्यातील निकाल प्रकाशित करण्यात आला आहे.
देशातील कोरोना लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या ३०६ वयोवृद्ध व्यक्तींवर या नाकावाटे दिल्या जाणा-या अँटी-कोविड स्प्रेची चाचणी करण्यात आली आहे. त्यावेळी हा स्प्रे खूपच फायदेशीर असल्याचे दिसून आले. मुंबईमधील औषध निर्माण करणारी कंपनी ग्लेनमार्कने नेझल स्प्रेची चाचणी केली आहे. या कंपनीने देशातील कोरोनासाठीचा पहिला नेझल स्प्रे लॉंच केला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या स्प्रेसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात आली होती. यानंतर आता हा स्प्रे लाँच करण्यात आला आहे.