रांची : खाण घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालयाच्या रडावर आलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागील साडेसाती संपतही नाही तोच ईडी आणि प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी काँग्रेसच्या दोन आमदारांवर एकाच वेळी छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे.
काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल सिंह ऊर्फ अनूप सिंह आणि प्रदीप यादव आणि त्यांच्या सहका-याच्या घरांवर छापे टाकले.रांची, बोकारो गोड्डा येथे ९ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.
कोळसा व्यावसायिक अजय कुमार सिंह यांच्या घरावरही ईडीच्या पथकाने छापा टाकला. अजय हे आमदार अनुप सिंह यांचे निकटवतीर्य आहेत. शिवशंकर यादव यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्यांशिवाय रांचीमधील न्यूक्लियस मॉलचे मालक विष्णू अग्रवाल यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत. इडीची आठ पथके दोन्ही आमदारांच्या गोड्डा, रांचीमधील कांके रोड आणि दोरांडा येथील नऊ ठिकाणी झाडाझडती घेत आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावल्यानंतर ईडी आणि प्राप्तिकर विभागाने या कारवाया केल्याने राज्यातील राजकीय तापमान आणखी तापले आहे.