अहमदाबाद : जेमतेम १३ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग रविवारी स्फोटाद्वारे उडवून लावण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबरला या रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले होते. घटनास्थळी दारुगोळा सापडला आहे. स्फोटामुळे रुळ दुभंगले असून स्फोट होण्यापूर्वी ४ तास अगोदर या ट्रॅकवरून रेल्वे गेली होती. या घटनेनंतर अहमदाबादहून उदयपूरला येणारी रेल्वे डुंगरपूरलाच थांबवण्यात आली.
ग्रामस्थांच्या सावधगीरीमुळे सलूम्बर रेल्वे मार्गावरील केवड्याच्या नाल्यावरील पुलाजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. ग्रामस्थानी रात्री १० च्या सुमारास स्फोटाचा आवाज ऐकला. त्यानंतर काही तरुणांनी तत्काळ पटरीच्या दिशेने धाव घेतली.
लोखंडी रुळाला अनेक ठिकाणी तडे गेले होते. रुळाचे नटबोल्टही गायब होते. ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यानंतर रविवारी सकाळी अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.