न्युयॉर्क : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने ओरियन स्पेस क्राफ्टने आर्टेमिस १ ही मोहीम यशस्वीरित्या पुढे सरकत असून चंद्राच्या दुस-या बाजूने पृथ्वी कशी दिसते याचे फुटेज पाठविले आहे. चंद्राच्या दुस-या पृष्ठभागाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या ओरियन स्पेस क्राफ्टने जो नेत्रदीपक व्हिडीओ पाठवला आहे, त्यात चंद्रावरून पृथ्वीचा उदय दिसत आहे.
ओरियन स्पेसक्राफ्टने चंद्राजवळ उड्डाण करताना पृथ्वीला त्याच्या उच्च रिझोल्यूशन कॅमेरात कैद केले.
नासाने पाठविलेले हे यान २१ नोव्हेंबरला चंद्राजवळ पोहोचल्यानंतर त्याचे इंजिन सुरू केले होते. ज्यावेळी ओरियन स्पेसक्राफ्टने हे फुटेज पाठवले त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ७३ ,००० किलोमीटर दूर होते. त्यामुळे पहिल्यांदाच चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते, हे स्पष्ट होते. ओरियन अंतराळ यानाने चंद्राच्या जवळून ८१ मैल त्रिज्येसह चंद्राचा पृष्ठभाग ओलांडला. विशेष म्हणजे नासाचे हे यान मानव विरहीत आहे. यात कोणताही अंतराळवीर नाही.
चार सौर पंख देतायत यानाला उर्जा
नासाचे आर्टेमिस १ स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट हे चंद्र मोहिमेवर जाणारे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. याना ऊर्जा देण्यासाठी त्यात ४ सौर पंख आणि ३ पॅनेल बसविले आहेत. त्यामुळे २५ दिवस चालणा-या मिशनसाठी वीज पुरवठा केला जाणार आहे. इतक्या सोलर पॅनल्सवर तीन खोल्यांचे घर सहज प्रकाशित होऊ शकते.