36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeक्रीडानकोसा विक्रम, न्यूझीलंड अवघ्या ६२ धावांत गारद

नकोसा विक्रम, न्यूझीलंड अवघ्या ६२ धावांत गारद

एकमत ऑनलाईन

मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेता आणि जगातील अव्वल संघ असलेल्या न्यूझीलंडला नामुष्कीचा सामना करावा लागला. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात आज न्यूझीलंडचे सर्व खेळाडू आल्या पावली माघारी गेले. संपूर्ण संघ फक्त ६२ धावात गारद झाला. भारतीय गोलंदाजांच्या तिखट मा-यासमोर किवी संघ फक्त २८.१ षटकेच खेळपट्टीवर राहू शकला. एकाही किवी फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे किवी संघाच्या नावे लाजिरवाणे विक्रम नोंदले गेले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुस-या दिवसअखेर भारताने आपल्या दुस-या डावात बिनबाद ६९ धावा केल्या असून त्यांच्याकडे आता ३३२ धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ ६२ धावांत गारद झाला. यापूर्वी हा नकोसा विक्रम भारताच्या नावावर होता. ३४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना भारतीय संघ अवघ्या ७५ धावात गारद झाला होता. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघही ७९ धावांत गारद झाला होता.

भारताविरुद्ध न्यूझीलंडची ही आतापर्यंतची चौथी निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी २००२ साली न्यूझीलंडचा संघ ९४ धावांत आटोपला होता. तसेच आणखी एक नकोसा विक्रम किवी संघाच्या नावावर जमा झाला आहे. वानखेडे मैदानावर सर्वात कमी धावसंख्येत गारद होणारा संघ म्हणून न्यूझीलंडची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम त्यांच्या शेजारी देश असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ९३ धावात सर्वबाद झाला होता.

न्यूझीलंडची कसोटीतील ६ वी नीचांकी धावसंख्या
न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील ही सहावी नीचांकी धावसंख्या आहे. तसेच कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध ६२ धावा ही न्यूझीलंडची सर्वात खराब कामगिरी आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला ६२ धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताविरुद्ध ७९, तर इंग्लंडचा संघ ८१ धावांत आटोपला होता.

अश्विनचाही विक्रम
रविचंद्रन अश्विनने ५० व्यांदा एका डावात ४ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय ठरला आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६६ वेळा एका डावात ४ विकेट्स घेतल्या, तर अश्विनने २०२१ मध्ये ४८ कसोटी विकेट घेतल्या आहेत. तो यावर्षी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

न्यूझीलंडच्या एजाज पटेलचे १० बळी
तत्पूर्वी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी करीत भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. एजाजने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. मात्र, प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाजच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करीत न्यूझीलंडला घायाळ केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या