25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमराठवाडामराठवाड्यात ५३ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात ५३ मंडळात अतिवृष्टी

एकमत ऑनलाईन

सर्वत्र नद्यांना पूर, मुंबई, कोकणासह विदर्भात दाणादाण, ८४ जणांचा बळी
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी पुरात लोक वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना आणि पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले आहेत.

मराठवाड्यात तब्बल ५३ मंडळांत अतिवृष्टी. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ मिमी पाऊस झाला असून, आज पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस झाला असून, नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांत पाणी शिरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील ३४ प्रकल्पातील पाणीपातळी शंभर टक्क्यांवर आले आहे. पाणीसाठा वाढल्याने विष्णपुरी धरणाचे ६ दरवाजे उघडले आहेत. गेल्या दोन दिवसांत नांदेड जिल्ह्यात १८४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडचा माहूरगड दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे. पैनगंगेला पूर आल्याने विदर्भातून माहूरकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण ३५ टक्के भरले आहे. केज तालुक्यातील मांजरा धरणात १.३२३ दलघमी पाणीसाठा वाढला आहे.

विदर्भातही पावसाने दाणादाण उडाली. अमरावतीत गुरुवारी इमारत कोसळली. शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या गांधी चौक ते रवीनगर मार्गावर ही घटना घडली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथे नृसिंह सरस्वती मंदिरात अडकलेल्या १५ भाविकांची आज सुखरूप सुटका करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. जवळपास दहा मार्ग बंद झाले. पाऊस आणि पुराची परिस्थिती बघता १६ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. गोसेखुर्द धरणातून १२,२८२ क्युसेक जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. यवतमाळ शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण शंभर टक्के भरले आहे. हे चंद्रपूरमधील अनेक भागात इरई नदीचे पाणी शिरले आहे. तापी आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे जळगावच्या हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले आहेत.

याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने आज होणा-या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात १० कामगार अडकले होते. अखेर १५ तासांच्या बचावकार्यानंतर सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने झोडपले असून, कोल्हापुरात पंचगंगा ३५ फूट पातळीवरून वाहत आहे. आता ती धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात कोयना, चांदोली, धोम, वारणा आदी धरणात ४० ते ४५ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. तसेच पुण्यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे.

जायकवाडीत ५३ टक्के पाणीसाठा
जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या ५ दिवसांपासून नाशिकमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. मात्र, आता नांदूर-मधमेश्वरमधून विसर्ग कमी झाला आहे. तसेच जायकवाडीत येणा-या पाण्याची आवकदेखील कमी झाली आहे.

तब्बल ३४ प्रकल्पांत
१०० टक्के पाणीसाठा
मराठवाड्यात जवळपास ३४ प्रकल्पांतील पाणी पातळी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. हदगाव व भोकर येथे काल पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले. पैनगंगेच्या पुरामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला होता. किनवटच्या २०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले.

अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, कोकण भागात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे कोकणात पर्यटन जवळपास बंद आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या