अकोला : उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणे कमीपणाचे आहे. त्यांच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणे चुकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शब्द मागे घ्यावेत. मी यासंदर्भात नाराजी व्यक्त करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस हे अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर देऊ, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हमीभावापेक्षा कमी भाव झाला तर सरकार हमीभावाने खरेदी करेल असेही फडणवीस म्हणाले. १०० दिवसांत सरकारने खूप चांगले निर्णय घेतले आहेत. आम्ही अविश्रांत काम करत असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीसांनी अकोल्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर ते आज पहिल्यांदाच अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडले.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा
काल प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. सेनेतील फुटीची स्क्रिप्ट भाजपने लिहिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर फडणवीस म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची स्क्रिप्ट कोण लिहिते ते पाहा. दरम्यान, आमचे सरकार सध्या चांगले काम करत आहे. सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
‘आदिपुरुष’ चित्रपट पाहिला नाही
‘आदिपुरुष’ चित्रपट मी पाहिला नाही. त्यात काय आहे हे मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मी यावर बोललो तर माझा आदिमानव होईल, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.