नवी दिल्ली : देश हादरवून सोडणा-या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेत एका मानवी कवटीच्या खालच्या भागातील तीन हाडे आणि जबडा सापडला आहे. ही हाडे श्रद्धाची असावीत, असा अंदाज असून ती तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविली जाणार आहेत.
प्राथमिक तपासात हा जबडा मानवाचा असल्याचे स्पष्ट होत आहे. या घडामोडीत दिल्ली पोलिसांचे पथक
आफताबचे कुटुंब ज्या सोसायटीत राहत होते, त्या युनिक पार्कमध्येच पोचले. पोलिसांनी सोसायटी सेक्रेटरी अब्दुल्ला यांची तीन तास चौकशी केली. अब्दुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबचे आई-वडील २० दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा मोबाईल नंबरही बंद आहे.
आफताबला मिटवायचा होता प्रत्येक पुरावा
पोलिसांच्या चौकशीत आफताबने सांगितले की, त्यानं आधी तिन्ही फोटोंच्या फ्रेम्स तोडल्या आणि नंतर त्या किचनमध्ये जाळून टाकल्या. आफताबला श्रद्धाशी संबंधित सर्व पुरावे नष्ट करायचे होते. त्यासाठी त्याने २३ मे रोजी घरातील श्रद्धाचे सामान पिशवीत भरले. आफताबच्या फ्लॅटमधूनही पोलिसांनी एक बॅग जप्त केली आहे. त्यात श्रद्धाचे कपडे आणि बूट सापडले आहे.
दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्रातील चौघांची चौकशी
दिल्ली पोलिसांच्या पथकाने शनिवारी महाराष्ट्रातील पालघरमध्ये चार लोकांचे जबाब नोंदवले. त्यांच्याकडून श्रद्धाने आफताबच्या प्राणघातक हल्ल्यानंतर मदत मागितली होती. यापैकी एक मुंबईतील कॉल सेंटरचा माजी व्यवस्थापक आहे, जिथे श्रद्धा काम करायची आणि दुसरा तिचा मित्र आहे.