28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्र१०० कोटींचे आरोप एक कोटी १० लाखांवर आले

१०० कोटींचे आरोप एक कोटी १० लाखांवर आले

एकमत ऑनलाईन

 अनिल देशमुखांच्या अटकेबाबत शरद पवारांचे गंभीर आरोप
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘देशमुखांना अटक करताना आधी त्यांच्यावर शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतरच्या आरोपपत्रांमध्ये ही रक्कम एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत आली. तेवढ्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यांपासून तुरुंगात डांबण्यात आले,’’ असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, ‘‘सध्या देशात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सीबीआय, ईडी, आयटी या यंत्रणांशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ते एक मेहनती आणि ठाम भूमिका घेणारे गृहमंत्री होते. त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात देशमुखांवर कुणातरी व्यक्तीकडून शिक्षण संस्थेसाठी १०० कोटी रुपयांची देणगी घेतल्याचा आरोप करण्यात आला.’’

‘‘यानंतर या आरोपांचा तपास झाला आणि एक महिन्याने नवे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात ती रक्कम १०० कोटी रुपये नाही, तर चार कोटी रुपये होते असे सांगण्यात आले. आरोपपत्र १०० वरून चार कोटींवर आले. आता १५ दिवसांपूर्वी पुन्हा नवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि त्यात चार कोटी नाही, तर १ कोटी आणि १० लाख रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात आले,’’ असे शरद पवार यांनी सांगितले.

‘‘सुरुवातीचे १०० कोटींचे आरोप आता एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत आले’’
‘‘म्हणजे १०० कोटींपासून आरोपांची सुरुवात झाली आणि आता एक कोटी १० लाख रुपयांपर्यंत आले. ही रक्कम कशासाठी घेतली तर शिक्षण संस्थेची इमारत उभारण्यासाठी घेतली. यासाठी गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यांपासून तुरुंगात ठेवण्यात आले,’’ असेही पवारांनी नमूद केले.

‘‘राजकारणात विरोधात बोलण्याचा अधिकार नाही का?’’
‘‘हे काय आहे? लोकशाहीत, राजकारणात विरोधात बोलण्याचा अधिकार नाही का? आम्ही चुकीच्या गोष्टी बोललो असेल तर बदनामीचा खटला करावा. मात्र, तसे न करता गृहमंत्र्यांना मागील १० महिन्यांपासून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यात आला,’’ असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या