मुंबई : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने इतर मदतदुतांप्रमाणे आपल्या विळख्यात घेतले आहे. परंतु आत्तापर्यंत १०० बेस्ट योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. बेस्टच्या १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील आठ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १०० कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढा यशस्वी झाला असून त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत कोरोना संसर्गाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या बेस्टमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बेस्टमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Read More आणखी अडीच हजार रेल्वेगाड्या सोडणार
बेस्टच्या १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
बेस्टमधील आतापर्यंत १९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी ७० टक्के चालक आणि वाहकांचा समावेश आहे. तर उर्वरित कर्मचारी हे तांत्रिक आणि विद्युत विभागातील आहेत. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहेत. रिक्षा, टॅक्सी, ओला, रेल्वे बंद असल्यामुळे याचा भार बेस्टवर आला आहे. दररोज १ हजार ५०० बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे तीन हजारपेक्षा जास्त चालक-वाहक आपले कर्तव्य बजावत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान,कोरोनावर मात करण्याचे ४८ टक्के प्रमाण असल्याचे बेस्ट उपक्रमातील जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.