नवी मुंबई : पनवेल बस स्थानकातून महाडला जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात अचानक आग लागल्याने गाडी संपूर्ण जळाली असून, बसचा सांगाडाच उरला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत एकालाही इजा झाली नाही.
या बसमधून २२ ते २३ प्रवासी प्रवास करीत होते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बम्ब घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गाडीचा सापळाच उरला होता. पनवेल येथून निघालेली बस महाडला जात असताना कर्नाळा बर्ड सेंच्युरीच्या चढाला लागल्यानंतर गाडीतून अचानक धूर निघायला लागला. त्यावेळी प्रसंगावधान राखून चालकाने गाडी थांबविली.
त्यानंतर कंडक्टरने प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले. त्यावेळी प्रवाशांनी आपले सामान घेऊन गाडी रिकामी केली. घाईगडबडीत एका महिलेची बॅग मध्येच अडकली. त्यामुळे त्या बॅगेतील १५ हजार जळून गेले. मात्र, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. त्यानंतर दोन अग्निबम्ब दाखल झाले आणि त्यांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले.