अहमदाबाद : गुजरातच्या मोरबी येथील कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीची एक भिंत कोसळल्याने तब्बल १२ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीच्या ढिगा-याखाली तब्बल ३० मजूर अद्यापही अडकले असल्याची भीती आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या हलवाड जीआयडीसीमध्ये सागर सॉल्ट कंपनीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. यामधून आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिक आमदार ब्रजेश मेरजा यांनी १२ मजुरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर
दरम्यान, मोरबी येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीदेखील मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री पटेल यांनी मोरबीच्या जिल्हाधिका-यांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
मोरबी येथील कारखान्याची भिंत कोसळून झालेली घटना हृदय हेलावणारी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत असून, अपघातात जखमी झालेले मजूर लवकर बरे होवोत अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.