कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापौर, उपमहापौरांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
लातूर : तिन्ही लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोनाबाधितांची नगण्य संख्या असलेल्या लातूर शहरात अनलॉक-१ मध्ये कोरोनाबाधित रुग्णंची संख्या लक्षणिय झाली आहे़ दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ही बाब लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लातूर शहरात १४ दिवसांच्या लॉकडाऊनची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
सदर लॉकडाऊन शनिवार दि. ४ जुलैपासून करावे, असेही नमुद करण्यात आले असून आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. लातूर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यापर्यंत आटोक्यात होती़ एप्रिलअखेरीस जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात केवळ १६ रुग्ण उपचार घेत होते. त्यामुळे लातूर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली होती.
याचदरम्यान लॉकडाऊन शिथिल करण्यात आले़ उद्योग, व्यवसायांना परवानगी देण्यात आली़ त्यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिक घराबाहेर पडू लागले, प्रारंभीच्या काळात फिजिकल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे यासह वाहतुकीच्या नियमांचे पालन होत होते, पण हळूहळू या नियमांचे विस्मरण नागरिकांना झाल्याचे सध्याचे तरी चित्र आहे़ नियमाचे भंग होत असताना अशांवर होणारी कारवाईसुद्धा मंदावली़ या सर्व बाबींचा परिणाम कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यावर होतो आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात तीन टप्प्यांत लॉकडाऊन करण्यात आले़ ़ १ जूनपासून राज्यासह देशभरात अनलॉक-१ सुरू करण्यात आले़ त्यामुळे टप्प्या-टप्प्याने बाजरपेठा, व्यवहार सुरू झाले़ मात्र अनलॉक-१ मध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ साहजिकच लातूर शहरातही गेल्या १०-१२ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ दि़ २१ जून ते १ जुलै या ११ दिवसांचाच विचार केला तर या ११ दिवसांत लातूर शहरात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
लातूर शहराच्या चिंतेत भर टाकणारी ही रुग्ण संख्या आहे़ त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे़ त्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लातूर शहरात १४ दिवसांचे लॉकडाऊनची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली आहे़ आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लातूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागुन आहे़
बैठकीत घेतला कोरोनाचा आढावा
दरम्यान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी गुरुवारी महानगरपालिकेत बैठक घेवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला़ सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या़ यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समितीचे सभापती अॅड़ दीपक मठपती, नगरसेवक राजा मणियार, मनपा आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते़ शहरातील वाढती कोरोनाबाधित रुग्णसंख्या पाहता साखळी तोडण्याकरिता शनिवारपासून १४ दिवसांचे कडक लॉकडाऊन लागु करणाची शिफारस जिल्हाधिकारी यांचाकडे करण्यात आली आहे़ या शिफारसीला मनपाचे सर्व पदाधिकारी, सभागृहनेते यांनी दूरध्वनीवरुन सहमती दर्शविल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
Read More कंधार शहरात तीन दिवसाचा ‘ जनता कर्फ्यू ‘