33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानात रोज १६७ बालकांचा मृत्यू

अफगाणिस्तानात रोज १६७ बालकांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

आरोग्य सुविधांचा अभाव, अनेक मुले मृत्यू शय्येवर
काबूल : अफगाणिस्तानमध्ये रोज तब्बल १६७ बालकांचा मृत्यू होत आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार हा आकडा केवळ अधिकृत आहे आणि वास्तव यापेक्षाही वाईट असू शकते. घोर प्रांतातील सर्वोत्तम रुग्णालयातील अनेक खोल्या आजारी मुलांनी भरलेल्या आहेत. रुग्णालयात एका बेडवर किमान २ मुले दाखल आहेत तर ६० मुलांसाठी वॉर्डात केवळ २ नर्स कार्यरत आहेत.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार ही मुले गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. तथापि, हे रोग बरे होऊ शकतात. वास्तविक अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधांची अवस्था नेहमीच वाईट राहिली आहे. तालिबानच्या ताब्याआधी परकीय निधीतून येथे उपचार सुविधा उभारल्या गेल्या, पण हेही २०२१ नंतर थांबले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार गेल्या २० महिन्यांत अनेक मोठी रुग्णालये बंद झाली आहेत.

सत्ता काबीज केल्यापासून तालिबान महिलांवर सातत्याने वेगवेगळी बंदी लादत आहे. महिलांना स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे एजन्सी समाजसेवेच्या स्वरूपातही मुलांना मदत करू शकत नाहीत. घोर येथील रुग्णालयात काम करणा-या डॉ. समदी यांनी सांगितले की, रुग्णालयात पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर नाहीत. उपचारासाठी आवश्यक असलेल्या इतर मशिन्सचाही तुटवडा आहे.

डॉ. समदी म्हणाले की, आमच्याकडे आवश्यक प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत. महिला कर्मचा-यांची मोठी कमतरता आहे. जेव्हा आमच्याकडे सर्व मुले गंभीर स्थितीत असतात, तेव्हा आम्ही कोणत्या मुलावर प्रथम उपचार करावा, त्यांना मरताना पाहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.

सरकारला मान्यता
नसल्याने निधी नाही
संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानसाठी आवाहन केलेल्या निधीपैकी केवळ ५ टक्के निधी त्यांना मिळाला आहे. खरेतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने काबूल तसेच संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. यापूर्वी २१ वर्षे अफगाणिस्तानात सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. २०२१ मध्ये सत्ताबदल झाल्यापासून तालिबानच्या सरकारला आतापर्यंत मान्यता मिळालेली नाही. अशा परिस्थितीत देशासाठी पैसा वाटप करणे कठीण झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या