मुंबई : राज्यात अद्यापही १७.५ लाख टन ऊस शिल्लक असून हा ऊस कारखान्याला तुटून जाण्यासाठी जून महिन्यातील दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. राज्यात अजूनही बीड, उस्मानाबाद यासह ३० हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.
राज्यात मागच्या कित्येक वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु अद्यापही राज्यातील साखर कारखाने सुरू असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. साखर कारखाने जवळ असूनही उसाला तोड येत नाही तर भारनियमनामुळे काही शेतक-यांचे उसाचे पीक शेतातच वाळत असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे १७.५ लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस ३१ मेपर्यंत गाळप केला जाईल.
अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले. इतर राज्यातून १२९ हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या २९ हार्वेस्टर काम करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच
कारखान्यांचा हंगाम जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.