औरंगाबाद : राज्यात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली असून, मराठवाड्यात दिवसाला १६ जण बेपत्ता होत असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीतून समोर आली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३ हजार २११ जण बेपत्ता झाले आहेत.
ज्यात सर्वाधिक १ हजार २१ महिला-पुरुष औरंगाबाद जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. मागील सहा महिन्यांत मराठवाड्यातील १७०० महिला आणि १४०० पुरुष बेपत्ता झाले आहेत. त्यातील अनेकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.
जालना पोलिसांची उत्तम कामगिरी…
मिसिंग गुन्ह्यातील बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात जालना पोलिसांची उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत जालना जिल्ह्यातून ४२७ जण बेपत्ता झाले आहेत. त्यातील ३५४ जणांना शोधून काढण्यास जालना पोलिसांना यश आले आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक बेपत्ता झाल्याची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात असून,गेल्या सहा महिन्यांत १ हजार २१ जण बेपत्ता आहेत. ज्यात ४९४ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. औरंगाबादच्या वाळूज, चिखलठाणा, शेंद्रा, चित्तेगाव आणि पैठण एमआयडीसी भागातून बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त आहे.