26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीकाळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : गरीब व सामान्यांसाठी आलेला रेशन तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडण्यात आला़ या कारवाईत एकूण १८५़५ क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. यात परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीसह पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलीस पथकांनी ०२ लाख ७५ हजार ७८१ रूपयांच्या तांदळासह ०५ लाख ५० हजारांचे दोन वाहन असा एकूण ०८ लाख २५ हजार ७८१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण ०८ आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून ०७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिंतूर ते साखरतळा रोडवर जिंतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोडलगतच्या शकील बेग खलील बेग यांच्या शेतातील टीन शेडमध्ये साठा करून ठेवलेला ०१ लाख ६९ हजार २०० रूपयांचा ११२ क्विंटल ८० किलो तांदूळ जप्त केला आहे. या प्रकरणीत नागनाथ तुकडे यांच्या माहितीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद साजिद सय्यद गफूर याच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तुकाराम मुंडे यांचे पवन ट्रेडींग आडत दुकानावर कारवाई करून एकूण १६ हजार ७३१ रूपयांचा १२ क्विंटल ८७ किलो तांदूळ पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण ४४ हजार ८५० रूपयांचा ९० किलो रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर आरोपीकडून ०३ लाखाचे चार चाकी वाहन असा एकूण ०३ लाख ४४ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात नवा मोंढा भागात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण ४५ हजार रूपयांचा ३० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. सदर मालाची वाहतूक करण्यात येणारे ०२ लाख ५० हजार रूपयांचे वाहन असा एकूण ०२ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली.

जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस अधीक्षक जयंत मीना व स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि तुकडे, पोलीस अंमलदार चाटे, डुबे, पौळ, पोउपनिक़ुसमे पोलीस अंमलदार परसोडे, सातपुते व चव्हाण, पोउपनि़मारोती चव्हाण, पोउपनि़ साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार तुपसुंदरे, खुपसे व रफीक आदींनी सहभाग होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या