मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली. आयोगाने आपल्या निर्णयात २०१८ ची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने झाली नसल्याचा एक मुद्दा उपस्थित केला होता. पण ही कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनेच झाल्याचा दावा करत थेट याचा एक व्हीडीओ खासदार अरविंद सावंत यांनी समोर आणला.
या व्हीडीओत सभागृहात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसते आहे. तसेच यावेळी विविध पदांच्या घोषणाही करण्यात आल्याचे दिसत आहे. यामध्ये लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत.
त्याचबरोबर या ज्येष्ठ नेत्यांकडून भाषणंही करण्यात आल्याचे या व्हीडीओत दिसत आहे. यामध्ये अनेकांनी ठाकरे कुटुंबियांचे कौतुकही केले आहे. तसेच यावेळी खासदार गजानन कीर्तिकर यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिल्याचेही यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
सावंत यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
अरविंद सावंत यांनी हा कीर्तिकर सादर करताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले. देशाचा सध्या अमृतकाल सुरू आहे की विषकाल हे आता ठरवावे लागेल. देशाच्या सर्वोच्च घटनेलाच निवडणूक आयोगाने घाव घातला आहे. मग कशाला घटनेत परिशिष्ट १० समाविष्ट केले? असा सवालही त्यांनी केला. आम्ही आमच्या कार्यकारिणी निवडीचे पत्र ४ एप्रिल २०१८ला निवडणूक आयोगाकडे सादर केले पण आयोगाने धादांत खोटे सांगितले की ते आम्ही दिलेच नाही.